नवे आणि कल्पक रूप

(महाराष्ट्र टाईम्स-२/७/२०२०)

दर वर्षी आषाढात अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. या शुभारंभाचा सोहळाही होतो. यंदा सारे गणितच बदलले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले.

नवे आणि कल्पक रूपनवे आणि कल्पक रूप
आषाढी एकादशीला सुरू होणारे सण, उत्सव आणि यात्रांचे दिवस थेट दिवाळीपर्यंत चालू राहतात. यंदा करोनाकहराने जगण्याचे आयामच बदलून गेले आहेत. मग त्यापासून उत्सव तरी वेगळे कसे राहणार? दर वर्षी लाखो भाविकांनी ओसंडून वाहणारी पंढरी जशी यंदा भक्तांविना ओस पडली, तशीच स्थिती गणेशोत्सवात महाराष्ट्रभर दिसेल. दर वर्षी आषाढात अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. या शुभारंभाचा सोहळाही होतो. यंदा सारे गणितच बदलले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. त्याला मंडळांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मुंबई-ठाण्यात व पुण्यात मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर भव्य व विशाल मूर्तींसाठी विख्यात असणाऱ्या बहुतेक मंडळांनी मूर्तींची उंची कमी करून, ती तीन, साडेतीन, चार फूट इतकीच मर्यादित ठेवण्याचे ठरविले. ‘लालबागच्या राजा’ने तर एक पाऊल पुढे टाकत, यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही आणि त्याऐवजी दहा दिवस ‘आरोग्यउत्सव’ करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय स्वागतार्हच नव्हे, तर अनुकरणीयही आहे.
महाराष्ट्रभर या निर्णयाचे पडसाद उमटतील. मंडळाने या निर्णयाचे ‘देश हा देव असे माझा’ अशा अत्यंत अचूक शब्दांत वर्णन केले आहे. हे दहा दिवस रक्तदान, प्लाझ्मादान, गलवानच्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना साह्य, करोनावीर पोलिसांच्या कुटुंबांना साह्य अशा उपक्रमांनी गणेशोत्सव होणार आहे. महाराष्ट्रातली गणेशोत्सव मंडळे याआधीच करोनाच्या लढाईत उतरली असून, ठिकठिकाणी कामाला जुंपली आहेत. ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने केलेल्या आवाहनानंतर लाखो रुपयांच्या देणग्या मुख्यमंत्री निधीमध्ये जमा झाल्याच; पण अनेक मंडळांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या भागांत कामांची जबाबदारी स्वीकारली. ती कामे आजही चालू आहेत.
करोनाने झडप घातली तेव्हा ही साथ दोन-तीन महिन्यांत आटोक्यात येईल आणि मग गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र, दिवाळी हे सगळे चढत्या उत्साहाने साजरे होणारे सण, उत्सव पार पडतील, अशी आशा होती. आताचे चित्र मात्र भयावह असून, या वर्षी अगदी थेट नाताळपर्यंत कोणताही सण किंवा उत्सव दरवर्षीसारखा साजरा करता येणार नाही, याची स्पष्ट खूणगाठ मनाशी बांधण्याची गरज आहे. भारतीय समाज कितीही उत्सवप्रिय असला, तरी उत्सव म्हणजे ‘जनांचा प्रवाहो’ आणि करोनामध्ये माणसांनी माणसांपासून सदैव जास्तीत जास्त अंतर व कडक शिस्त राखण्याची निकड.
अशा वेळी, सगळीच उत्सवी मंडळे, कार्यकर्ते, त्यांचे नेते, मार्गदर्शक आणि सामान्य नागरिक यांनी समाजहिताची व दूरदृष्टीची भूमिका घेतली नसती, तर आजवरचा सगळा करोनालढा अयशस्वी ठरण्याची मोठी भीती होती. सुदैवाने, राज्यभरातील सगळीच गणेशोत्सव मंडळे या गंभीर परिस्थितीला उचित आणि पोक्त प्रतिसाद देत आहेत. हाच क्रम पुढे दहिहंडी व नवरात्र मंडळेही चालवतील, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव समन्वय समितीने श्रींचे आगमन, पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन या बाबतीत जी सविस्तर नियमावली जाहीर केली, तिचे पालन राज्यातील सगळी मंडळे करतील, यात शंका नाही.

मंडळांना सामाजिक कामासाठीही आवाहन करण्यात आले आहे. तसे काम बरीच मंडळे करीत आहेत. गेल्या शतकात प्लेगच्या साथीत महाराष्ट्रात कसा साधा व मर्यादित स्वरूपाचा उत्सव झाला होता, याच्या आठवणी जागविल्या जात आहेत. त्या बरोबर असल्या, तरी तेव्हाचा उत्सवांचा आवाका आणि आजचा विस्तार यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
राज्यातल्या सर्व मोठ्या मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविल्यामुळे काही समस्याही निर्माण होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सव हा काही हजार कोटी रुपयांची उलाढाल होणारा अवाढव्य व्याप बनला आहे. मंडपापासून सजावटीपर्यंत, लायटिंगपासून प्रसादापर्यंत, ढोलताशांपासून फूल-फळवाल्यांपर्यंत राज्यात लाखो रोजगार निर्माण होतात. हजारो कंत्राटे दिली-घेतली जातात. या प्रचंड उलाढालीत दर वर्षी गुंतणाऱ्या लाखो श्रमजीवींसाठी ठोस काही काम करता येईल का, याचाही विचार मंडळांनी व त्यांच्या मार्गदर्शकांनी करायला हवा.
पुढचे सारे उत्सव नेहमीसारखे झाले नाहीत, तर हा रोजगाराचा प्रश्न वर्ष संपेपर्यंत असाच चालू राहणार आहे. त्याबाबत नेमके काय करता येईल, याचा विचार मंडळांनी करावा. दुसरे म्हणजे, आज महामुंबईचा चार जिल्ह्यांचा परिसर, तसेच पुण्याचा सारा भाग यांना करोना दिवसेंदिवस अधिक ग्रासतो आहे. अशा वेळी, सगळ्या सार्वजनिक उत्सव मंडळांची शिस्तशीर व नेटकी बांधणी अधिक उपयोगी पडणारी आहे. सध्या सगळी मंडळे आपापल्या ताकदीनुसार काम करीत आहेत. धावून जात आहेत.
आता आपल्याला साऱ्या उत्सवाचा रोख समाजावरील संकटाकडे वळवायचा असल्याने, या कामांमध्ये अधिक सुसूत्रता आणि नेमकेपणा आणता येईल का, याचा विचार अग्रक्रमाने होण्याची गरज आहे. राज्य सरकारने यासाठी वेगळी समन्वय यंत्रणा लवकरात लवकर तयार करून, राज्यातल्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना या लढाईत कसे सामावून घेता येईल, याची आखणी करायला हवी. मिरवणूक काढायची नाही, वर्गणी घ्यायची नाही, हे निर्णय योग्य आहेत. मुंबईत गणेशोत्सव समन्वय समितीने ‘कोव्हिड कृतिदल’ स्थापण्याची कल्पना मांडली. काळाचौकी व इतर काही मंडळांनी अशी कृतिदले स्थापन केली. अशी कृतिदले राज्यभर वेगाने स्थापून, त्या सगळ्यांचा सरकारी यंत्रणांशी समन्वय साधता आला, तर जगात कुठेही झाले नाहीत, असे ‘सेवा उत्सव’ आपण साजरे करू शकू. गणेशोत्सवाचा आजचा खरा भक्तिमार्ग तोच आहे.