सामाजिक उपक्रम

सामाजिक उपक्रम

लालबागच्या राजाची महती सर्वदूर पसरू लागली. त्याचीच प्रचिती म्हणजे मंडळाकडे जमा होणाऱया आर्थिक निधीमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली. या निधीचा वापर विविध सामाजिक उपक्रमांकरिता मंडळ करीत असते. एकीकडे सार्वजनिक उत्सव साजरे करीत असताना दुसरीकडे मंडळ समाजसेवा, समाजप्रबोधनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबविते.

मंडळ राबवित असलेले उपक्रम

डायलिसीस सेंटर

डायलिसीस सेंटरडायलिसीस सेंटर मूत्रपिंड विकाराने त्रस्त झालेल्या व नियमितपणे डायलिसीस करायला लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या रुग्णांना आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा डायलिसीस करावे लागते. आर्थिकदृष्ट्या डायलिसीस महागडे असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचे आहे . त्यामुळे गरीब रुग्णांना नाममात्र शुल्कात डायलिसीस करता यावे या उद्देशाने मंडळातर्फे अद्ययावत असे लालबागचा राजा डायलिसीस सेंटर सुरु करण्यात येत आहे. या डायलिसीस सेंटरमध्ये रुग्णास केवळ रु. १००/- शुल्क आकारले जाईल. या डायलिसीस सेंटरमध्ये रुग्णांसाठी एकूण २४ डायलिसीस मशीन्सची व्यवस्था करण्यात आली असून वर्षाला 30,000 डायलिसीस करण्यात येतात. विख्यात नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बिच्चू यांच्या देखरेखेखाली रुणांना डायलिसीस देण्यात येते.

लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र (शासनमान्य)

लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र (शासनमान्य)सध्याच्या या आधुनिक युगात संगणक ज्ञान हे प्रत्येकासाठी अनिवार्य झाले आहे.  समाजाची ही गरज लक्षात घेऊन मंडळातर्फे सर्वांसाठी खुले असे लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र अल्प दरात सुरु करण्यात आले आहे.  सुसज्ज व अद्ययावत अशा या संगणक प्रशिक्षण केंद्रात ऑफिस ऑटोमेशन, डि.टी.पी., टॅली, ऑटोकॅड, प्रोगॅमिंग इ. अभ्यासक्रम नाममात्र दरात शिकविले जातात. या संगणक प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनमान्य MS-CIT अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले जातात.

मोफत योग प्रशिक्षण केंद्र

मोफत योग प्रशिक्षण केंद्रमहात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले की स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. तसेच निरोगी स्त्री आपले घरही निरोगी ठेवते. आपण सगळे जाणतोच की आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही म्हणूनच स्त्रीयांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मंडळाने सन २००५ पासून महिलांसाठी योग प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या योग केंद्राचा लाभ असंख्य महिला घेत आहेत. जुलै २०१० पासून पुरुषांसाठी योगकेंद्र सुरु करण्यात आले. योग केंद्रातर्फे दरवर्षी दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.

लालबागचाराजा प्रबोधिनी

समाजाच्या तळागाळातील गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदविण्यासाठी मंडळाने २० जून २००९ रोजी लालबागचा राजा प्रबोधिनी उभी केली आहे.  या प्रबोधिनीमध्ये साने गुरुजी अभ्यासिका, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यासवर्ग, इंग्रजी संभाषण वर्ग हे उपक्रम राबविले जातात.

साने गुरुजी अभ्यासिका

साने गुरुजी अभ्यासिकाकुटुंबातील माणसांची गर्दी, घराची लहानशी जागा या गोष्टी लक्षात घेऊन मुंबईतील मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी मंडळाने मोफत अभ्यासिका चालू केली आहे. ही अभ्यासिका संपूर्णत: वातानुकूलित असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. ही अभ्यासिका सकाळी ७ ते १० या वेळेत खुली असते.

स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय

आपण जाणतोच की वाचनामुळे मनुष्याची विचारशक्ती परिपूर्ण होते. तसेच सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षणाला पर्याय नाही. पण उच्च शिक्षणासाठी लागणाऱया पुस्तकांच्या किंमतीही उच्च असतात. पुस्तकांच्या वाढणाऱया किंमतींमुळे कित्येक चोखंदळ वाचक वा शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पुस्तके विकत घेऊ शकत नाही.

अनेक विद्यार्थी व वाचकांची ही अडचण लक्षात घेऊन मंडळातर्फे दि. १ ऑगस्ट २००६ स्वातंत्र्यवीर सावरकर  ग्रंथालय सुरू करण्यात आले. यात कथा-कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, नाट्य-कविता, ऐतिहासिक, राजकीय, आरोग्य, विज्ञान आणि बालवाङमय अंतर्गत अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार साहित्यकृती तसेच इंग्रजी साहित्य विश्वातील दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. यासोबत ग्रंथालयात विविध क्षेत्रातील इ. १० वी पासून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, तसेच UPSC/MPSC, MHT-CET, GRE, JEE, AIEEE, CAT, GATE, NDA, CDA, STAFF SELECTION, BARC, बँकिंग, विमा क्षेत्र, भारतीय रेल्वे, भारतीय विमान वाहतूक, इ. स्पर्धा व प्रवेश परीक्षा त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, कायदा, औषधशास्त्र, वैद्यकीय, संगणक, व्यवस्थापन, शिक्षण शास्त्र विषयक शाखांतील मान्यवर लेखकांची व विविध नामवंत प्रकाशन संस्थांची संदर्भ पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय संपूर्णत संगणकीकृत, अद्ययावत व सुसज्ज असे आहे.

संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी

विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षादरम्यान अभ्यासासाठी अनेक पुस्तके नित्यनियमाने लागतात. अशी पुस्तके विकत घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. परंतू आर्थिकदृष्टया गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही.  म्हणून या प्रबोधिनामध्ये राज्यभरातील गरीबवगरजूविद्यार्थ्यांसाठी `संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी’ सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. या पुस्तक पेढीतील पुस्तके सूंपर्ण वर्षासाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविली जातात.

स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यास वर्ग

या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांविषयी व त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती मिळावी म्हणून मंडळाने प्रबोधिनीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. त्या बरोबरच मंडळ विविध स्पर्धा परीक्षासांठी अभ्यास वर्ग देखील आयोजित करते.

MPSC मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण वर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱया विविध परिक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्यांना अच्युत्य यश प्राप्त व्हावे म्हणून या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर व प्रशिक्षण वर्ग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या मोफत उपक्रमाचा शेकडो विद्यार्थी लाभ घेत आले आहेत.

IAS / IPS प्रशिक्षण शिबीर

शैक्षणिक उपक्रमाचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा करण्याची संधी मिळावी व UPSC परीक्षेचे नेमके स्वरुप कळावे, या परीक्षेच्या पूर्वतयारी पासून ते त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी या हेतूने सन २००७ पासून प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकाऱयांच्या उपस्थितीत IAS/IPS प्रशिक्षण शिबिर आयोजित करते.  या उपक्रमाचा सातत्याने दोन वर्षे हजारो विद्यार्थी लाभ घेत आले आहेत.

इंग्रजी संभाषण वर्ग

जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही.  मराठी मुलांमध्ये असलेला इंग्रजी भाषेच्या वापराबाबतचा न्यूनगंड दूर करण्याकरिता मंडळाने विविध वर्गातील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संभाषण वर्ग सुरू केले आहेत.

 

नोकरी शोधयंत्रणा केंद्र

मुंबई महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देशा-परदेशात विविध जागांकरिता उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींची माहिती मिळावी याकरिता हे नोकरी शोधयंत्रणा केंद्र मंडळातर्फे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आले. या निमित्ताने मंडळाचा आणखी एक नाविन्यपुर्ण उपक्रम सुरू झाला. या केंद्रामध्ये वतर्मानपत्रे, नोकरी संदर्भातील विविध माहितीपत्रके व नियतकालिके उपलब्ध असून १० संगणक संच उपलब्ध आहेत. ज्याद्वारे विद्यार्थी देश विदेशात उपलब्ध असलेल्या नोकरीची संधी शोधू शकतो. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय सुद्धा या केंद्रामध्ये मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ७०४१ विद्यार्थ्यांनी केंद्राचा लाभ घेतला आहे.

करिअर गाईडंस व कौन्सिलिंग सेंटर

विद्यार्थ्याना आपले करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळावी तसेच विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत राहू नयेत म्हणून मंडळाने दि. २७ आॅगस्ट २०१८ पासून इयत्ता ९ वी व त्यावरील विद्यार्थ्याकरिता करिअर गाईडंस व कौन्सिलिंग सेंटर सुरु केले. विद्यार्थ्याना फक्त १०० रु.शुल्क आकारण्यात येणार असून महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्याकरिता विनाशुल्क ही सुविधा प्राप्त होणार आहे.

रायगड जिह्यातील पूरग्रस्तांना मदत

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाला महापुराचा जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी व गावात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये शेकडो लोक मृत्यू पावले. हजारो लोक बेघर झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मंडळाच्या १०० कार्यकर्त्यांचे पथक ८ दिवस महाड पोलादपूर तालुक्यात गेले होते. सोबत ७ डॉक्टरांचे पथकही होते. या आपद्ग्रस्त व दरडग्रस्तांना अन्नधान्य, कपडेलत्ते, भांडीकुंडी व वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. याकरिता मंडळाने रु. १२ लाख इतका निधी खर्च केला. कोंडीवते गावातील एकाच कुटुंबातील २२ माणसे दरड कोसळून ढिगाऱयाखाली गाडली गेली. त्यातील फक्त एकच महिला जिवंत राहिली. तिचे नाव श्रीमती सविता सकपाळ. तिला सरकारकडून मदत मिळेपर्यंत मंडळाने दरमहा रु. १०००/- ची मदत पाठविली व तिला जीवनावश्यक वस्तुंची मदत केली. पोलादपूर तालुक्यातील कोंडवी गावातील गँगरीन झालेल्या एका महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करुन तिला मरणाच्या दारातून बाहेर काढले.

मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी बदलापूर, कुर्ला (कामगार नगर) येथील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु इत्यादींचे वाटप केले. दिवा येथील आपद्ग्रस्तांना देखील अन्नधान्य, कपडे, चटया, भांडी इत्यादींचे वाटप केले.

पनवेल व गोरेगांव येथे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिबीर आयोजित करुन लोकांना टि.टी. इंजेक्शन्स टोचण्यात आली व अँटीबायोटिक्स, टॉनिक्स इत्यादींचे वाटप करण्यात आले. पनवेल येथील `शांतीवन’ या कुष्ठरोग्यांच्या आश्रमात रु. २ लाख किमतीची औषधे मंडळाकडून मदत म्हणून देण्यात आली.

२६ जुलै २००५ रोजी आलेल्या भयंकर महापुरामध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील शिवाई शिक्षण संस्थेचे महाविद्यालय संपूर्णपणे वाहून गेले होते. मंडळाने रु. ३ लाखांचे २ वर्ग नव्याने बांधकाम पूर्ण करुन शिवाई संस्थेच्या महाविद्यालय उभारणीस खारीचा वाटा उचलला.

जुई गाव पुनर्वसन प्रकल्प

दि. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या प्रलयंकारी महापुरामध्ये रायगड जिह्यातील महाड तालुक्यातील जुई गावात प्रचंड दरड कोसळून त्या दरडी खाली अनेक घरे गाडली गेली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली. एकुण ६६ घरातील लोक बेघर झाले. या लोकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मंडळाने जुईकरांना दिला होता. त्याप्रमाणे मंडळाने तशी तयारीही केली. त्यापैकी ३० घरांचे पुनर्वसन करण्याची संधी मंडळाला प्राप्त झाली. प्रत्येकी ४०० चौरस फुटांचे एक घर याप्रमाणे मंडळाने रु. ५० लाख खर्च करुन ३० घरांचे बांधकाम पूर्ण केले. मंडळाने जुईकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.  सदर दरडग्रस्तांना या घरकुलांचे चाव्या वाटप गुरुवार दि. २६ एप्रिल २००७ रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री  श्री. विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते जुई गावात करण्यात आले.  तत्प्रसंगी रायगड जिह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे, महाडचे आमदार माणिकराव जगताप, लालबागचे आमदार दगडूदादा सकपाळ, महाडचे जिल्हाधिकारी कांबळे साहेब, प्रांताधिकारी डॉ.शिवाजी पाटील, महाड व जुई गावाचे ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी, तसेच शासनाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंडळाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचे ठरविले होते. या शस्त्रक्रिया जे. जे. रुग्णालयातील प्रख्यात नेत्रशल्यविशारद मान. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या अधिपत्याखाली करण्यात आल्या. ३००० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

महारक्तदान शिबीर

सर्व दानांमध्ये श्रेष्ठदान रक्तदान आहे. रक्तदान हे अनेकांना जीवन देणारे दान आहे. रक्तदान म्हणजेच जीवनदान! संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विविध रूग्णालयांमध्ये असलेली रक्ताची अनुलब्धता पाहता यावर्षी मंडळाने महारक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एस.बी.टी.सी.(महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद) च्या सहकार्याने मंडळाने रविवार दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी भव्य दिव्य असे महारक्तदान शिबीर आयोजित केले.  सकाळी ६ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत सलग १८ तास चालू होते. ह्या भव्य दिव्य शिबीराचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रितीने करण्यात आले होते. सदर  महारक्तदान शिबीरास संपूर्ण मुंबापुरीतून व मुंबई बाहेरच्या रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला. एकुण १५२४८ रक्तपिशव्या संकलित झाल्या. ही संख्या कोणत्याही सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरातील रक्तपिशव्या जमा करण्याचा उच्चांक ठरेल. या रक्तदान शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय नौदलातील ३०० नौसैनिकांनी या रक्तदान शिबीरात गणवेशात येऊन रक्तदान केले. नेव्हीचे रिअर अॅडमिरल श्री. संजय महेंद्रु यांनी देखील स्वतः रक्तदान केले. विशेष म्हणजे नौदलाची आय.एन.एच.एस अश्विनी ही रक्तपेढी जी कोणत्याही नागरी रक्तदान शिबीरात सहभागी होत नाही, ती लालबागच्या राजाच्या महारक्तदान शिबीरात सहभागी झाली. या महारक्तदान शिबीराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शिबीरात जमा झालेल्या १५०० रक्तपिशव्या सीमेवर लढणा-या भारतीय जवानांसाठी जम्मू-काश्मीर येथील लष्करी रूग्णालयांत विमानाने पाठविण्यात आल्या. अशा रितीने जे सैनिक देशाचे रक्षण करतात,  त्यांची अल्पशी सेवा करण्याची संधी समस्त रक्तदात्यांना व पर्यायाने मंडळालाही मिळाली. हे एक मोठं देशकार्य मंडळ आणि आपल्या सर्वांकडून घडले आहे.
त्या व्यतिरिक्त या महारक्तदान शिबीरात महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यातील रक्त पेढ्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैंकी नागपुर, औरंगबाद, लातुर, चंद्रपुर या ठिकाणच्या रक्तपेढ्यांना रक्त जलद गतीने उपलब्ध करून तेथील रूग्णालयात पोहचविण्यासाठी मंडळाने विमानसेवा प्राप्त करून दिली होती.

त्रैमासिक रक्तदान शिबीर

मंडळाने आयोजित केलेले महारक्तदान शिबीर पाहून प्रभावित झालेल्या नौदलाच्या आय.एन.एच.एस. अश्विनी या रक्तपेढीने नौदलातील जवानांसाठी दर तीन महिन्यांनी मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करून १५० ते २०० रक्तपिशव्या आय.एन.एच.एस. अश्विनी या रक्तपेढीस द्याव्यात असा प्रस्ताव मांडला. मंडळाने सदर प्रस्ताव लगेच मान्य केला व नौदलाच्या जवानांसाठी त्रैमासिक रक्तदान शिबीर आयोजित करून १५० ते २०० रक्त पिशव्या पुरविण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे मंडळाने दि. १७ डिसेंबर २०१७ पासून त्रैमासिक रक्तदान शिबीरे आयोजित करून आय.एन.एच.एस. अश्विनी रक्तपेढीस रक्तपिशव्यांचा पुरवठा केला. मंडळास आणि रक्तदात्यांस देशसेवा करण्याची ही अमुल्य संधी मिळाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि रक्तदात्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यामुळे रक्तदाते उत्साहाने आणि आनंदाने या रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी येतात.